बस सुरू करण्यासंदर्भात भाजपा आदिवासी आघाडीचे प्रदेश सदस्य संदीप कोरेत यांचे अहेरीचे आगार व्यवस्थापकांना निवेदन
अहेरी : अहेरी तालुक्यातील दामरंचा परिसरातील प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरणारी बसफेरी जून महिन्यापासून बंद करण्यात आली. परिणामी प्रवाशांना खासगी वाहनधारकांना अधिकचे पैसे मोजून व धक्काबुकी खात प्रवास करावा लागत आहे. मात्र, संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे विविध गावांतील नागरिकांतून रोष व्यक्त केला जात आहे.
जून महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लहान-मोठया नदी नाल्यांना पूर आल्याने उपविभागातील शेकडो गाव संपर्का बाहेर होते. रस्त्यांवर पुराचे पाणी असल्यामुळे अनेक गावांतील बससेवा प्रभावित झाली होती. आता परिस्थिती पूर्वपदावर आली असून अनेक रस्त्यांवरील बसफेऱ्या पूर्ववत सुरु झाल्या आहेत. मात्र, दामरंचा परिसरातील नागरिक अजूनही लालपरीच्या प्रतिक्षेतच आहेत. तीन महिन्याहून अधिक कालावधी होऊनही बसफेरी सुरु न झाल्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
बसफेरी बंद असल्यामुळे परिसरातील जवळपास २८ गावांसह रोजगारासाठी राज्याबाहेर तेलंगणा राज्यात जाणाऱ्या लोकांनाही फटका बसत आहे. परिणामी नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घेऊन प्रवास करावा लागत आहे. या संधीचे सोने करीत खासगी वाहनधारक प्रवाशांकडून अधिकचे पैसे घेत आहेत. यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांची समस्या लक्षात घेऊन बसफेरी पूर्ववत व नियमित सुरु करण्याची मागणी केली जात आहे.
या गावातील नागरिकांची गैरसोय
दामरंचा बसफेरी बंद असल्यामुळे कमलापूर, आसा, नैनेर, कपेवंचा, नैनगुंडम, मोदूमडगू, मदूगू, मांड्रा, पालेकसा, कोडसेपल्ली, रुमलकसा, वेलगूर, दामरंचा, भंगारामपेठा, तोंडेर, चिटवेली, चिंतरवेल्ली, कुर्ता, दुब्बागुडम, जोनावाही, परली, बामणपली, मन्नेराजाराम, गेर्रा, येचली, रायगुडा, बासागुडा, मरमपल्ली, सिपनपल्ली या २८ गावांसह छत्तीसगढ राज्यातील चेरपल्ली, सांड्रा, मुक्टूसा, सिपनपल्ली, जारेगुडा, आरेपल्ली, गरतूल, गुंडापुरी या भागातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
बससेवा पूर्ववत सुरू करा : संदीप कोरेत
दुर्गम भागातील विविध गावातील नागरिक अवलबूंन असलेली दामरंचा बसफेरी बंद केल्यामुळे सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांची अडचण लक्षात घेऊन सदर बसफेरी पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी भाजपा आदिवासी आघाडीचे प्रदेश सदस्य संदीप कोरेत यांनी अहेरीचे आगार व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
0 Comments