हत्तीने केलेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या

रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे उपवनसंरक्षकांना निवेदन


आरमोरी : देसाईगंज तालुक्यातील बोळधा परिसरातील धानपिकांचे हत्तीच्या कळपाने मोठे नुकसान केले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असून वनविभागाने तत्काळ नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी उपवनसंरक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी बँकेतून पीककर्ज व उसनवारी पैसे घेऊन धान पिकांची लागवड केली. बोळधा, रावणवाडी येथील शेतकऱ्यांना यंदा चांगले उत्पादन होण्याची आशा होती. परंतु, दोन दिवसांपुर्वी कुरखेडा तालुक्यातुन देसाईगंज तालुक्यातील बोळधा, रावणवाडी परिसरात दाखल होऊन २३ जंगली हत्तीच्या कळपाने संपूर्ण पीक नेस्तनाबूत केल्याची माहिती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोडाम यांना दिली. घोडाम यांनी बोळधा, रावणवाडी परिसरातील शेतकरी सकाराम शेंद्रे, बकाराम शेंद्रे, तुकाराम शेंद्रे, रुषी मेश्राम, होमराज वाघाडे, पंढरी मेश्राम, धनिराम मेश्राम, मनोहर नेवारे, नानाजी गायकवाड यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली असता, काही दिवसांत हातात येणारे धान पिक पूर्णतः नष्ट झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळुन असून कर्जाची परतफेड करायची कशी ? या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. त्यामुळे वनविभागाने हत्तीच्या कळपाने नासधूस केलेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव भरपाई द्यावी, अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी उपवनसंरक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी शेतकरी महादेव कुमरे, सैलेश बगमारे, प्रितम ढोडणे, सुनिल कुमरे, सकाराम शेंद्रे, बकाराम शेंद्रे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments