बस सेवेसाठी विद्यार्थ्यांनी काढला तहसीलवर मोर्चा lokpravah.com




गडचिरोली : आसरअल्ली भागातील जवळपास 50 ते 60 विद्यार्थ्यांना मंगळवारला रात्री उशिरापर्यंत बस उपलब्ध न झाल्याने तब्बल 3 तास बसची प्रतीक्षा करावी लागली होती. तहसीलदार व पीएसआय यांनी खाजगी वाहन उपलब्ध करुन दिल्याने विद्यार्थ्यांना आपल्या गावी जाता आले. रापमच्या या प्रकारामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आज, 28 सप्टेंबर रोजी सिरोंचा तहसील कार्यालयावर धडक देवून मानव विकास मिशनची बससेवा शाळेच्या वेळेवर उपलब्ध करुन देण्याची मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली.
सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली, अंकिसा, रंगधामपेठा, वडधम, आयपेठा, पेंटीपाका, लंबडपल्ली, आदिमुत्तापूर, सूर्यारावपल्ली, मेडाराम, रंगय्यापल्ली, बामणी, ग्लासफोडपेठा, टेकडाताला आदी गावातील विद्यार्थी सिरोंचा तालुका मुख्यालयात शिक्षण घेण्यासाठी येतात. विद्यार्थ्यांच्या आवागमनासाठी मानव विकास मिशनच्या बसेस चालविल्या जातात. मात्र ही बससेवा अनियमित सुरु असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. अशातच मंगळवारला सायंकाळी 5 वाजता शाळेची सुटी झाल्यानंतर आसरअल्ली परिसरातील 50-60 विद्यार्थी गावी परत जाण्यासाठी सिरोंचा बसस्थानकात पोहोचले. मात्र रात्रीचे 8 वाजूनही बससेवा उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. एवढ्या रात्री घरी कसे जाणार? या विवंचनेत विद्यार्थी होते. दरम्यान, या प्रकाराबद्दल सिरोंचाचे तहसीलदार जितेंद्र शिकतोडे व पोलिस उपनिरीक्षक कांदे यांना माहिती मिळताच, त्यांनी एक खाजगी बस विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन दिल्याने विद्यार्थी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास गावी सुखरुप परतले. या प्रकारामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आज सिरोंचा तहसील कार्यालयावर धडक देत मानव विकास मिशनच्या बसेस शाळेच्या वेळेवर सुरु कराव्यात, अशी मागणी करीत मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले. यावेळी शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments