सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत महिला ठार lokpravah.com

संतप्त नागरिकांनी जाळले 10 ट्रॅक



मूलचेरा तालुक्यातील शांतीग्राम येथेल घटना

अहेरी : एटापल्ली तालुक्यातील बहूचर्चित सुरजागड प्रकल्पातील लोहखनिज वाहतूक करणा-या अवजड ट्रकांमुळे रस्त्यांची दैनावस्थेसह अपघाताची मालिका थांबण्याची चिन्हे नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहेत. सुरजागडवरुन मालवाहतूक करणा-या ट्रकने दुचाकीवरील एका महिलेला चिरडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, मंगळवारी मुलचेरा तालुक्यातील दामपूर-शांतीग्राम या गावादरम्यान घडली. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने सुरजागड लोहखनिज वाहतूक करणारी तब्बल 10 ट्रके आगीच्या भक्षस्थानी टाकली. तर अनेक वाहनांची नागरिकांद्वारे तोडफोड करण्यात आली. 

प्राप्त माहितीनुसार मुलचेरा तालुक्यातील कांचनपूर येथील रहिवासी सुभाष जयधर व पत्नी बिजोली जयधर हे दाम्पंत्य अहेरीवरुन सायंकाळच्या सुमारास गावाकडे परत येत होते. दरम्यान मुलचेरा तालुक्यातील शांतीग्राम गावाजवळ सूसाट वेगात असलेल्या मालवाहू ट्रकने मागून दुचाकीला जोरदार धडक दिली. यात बिजोली जयधर यांची जागेतच मृत्यू झाला. तर पती सुभाष जयधर किरकोळ जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच शांतीग्राम व दामपूर येथील नागरिकांनी घटनास्थळ गाठले. सदर घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी माल वाहतूक करीत असलेल्या वाहनांना थांबवून यातील 8 ते 10 वाहनांना पेटवून दिले. तर पाच ट्रकांची तोडफोड करण्यात आली. अपघातानंतर तणावाची स्थिती निर्माण झाल्याने पोलिस अधिकारी तसेच जवानांनी घटनास्थळ स्थिती नियंत्रणात आणली. सदर घटनेमुळे सुरजागड प्रकल्पा विरोधात नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत असून ग्रामस्थांद्वारे ट्रकांची जाळपोळ करण्यात आल्याने जिल्हाभरात एकच खळबळ निर्माण झाली आहे.

तीन वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती 



16 जानेवारी 2019 रोजी एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली-कर्रेम मार्गावर सुरजागडवरून कच्चा माल घेवून येणा-या ट्रकने रापमच्या बसला धडक दिली होती. या घटनेत 4 प्रवाशांचा मृत्यू तर 15 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले होते. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी जवळपास 15 ट्रकांना आग लावली होती. तर 10 ट्रकांची तोडफोड केली होती. या घटनेच्या तीन वर्षानंतर आज मंगळवारला आलापल्ली-आष्टी मार्गावरील शांतीग्राम-दामपूर जवळ अपघात घडल्यानंतर संतप्त नागरिकांनी 8 ट्रकांना आग लावून तीन वर्षांपूर्वीच्या घटनेला उजाळा दिला.

रस्त्याच्या दूरवस्थेने नागरिक त्रस्त

सुरजागड प्रकल्पातून दररोज शेकडो ट्रक कच्चा माल घेवून एटापल्ली-आलापल्ली-आष्टी मार्गे चंद्रपूर जिल्ह्यात आवागमन करीत असतात. त्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून आलापल्ली-आष्टी मार्गाची खस्ता हालत झाली आहे. जागोजागी खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. धुळीमुळे समोरुन येणारे वाहन सुद्धा निदर्शनास येत नाही. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. मात्र संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

Post a Comment

0 Comments