शासकीय जागेवर अतिक्रमण भोवले
चामोर्शी : तालुक्यातील मारोडा येथील ग्रामपंचायत सदस्य नंदा पुरुषोत्तम बोरकुटे व शेषराव नानाजी जुवारे या दोन्ही सदस्यांचे शासकीय जागेवर अतिक्रमण असल्याने त्यांच्या विरोधात एकनाथ नागोबा चलाख यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. शासकीय जागेवर अतिक्रमण असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या दोन्ही सदस्यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी यांनी रद्द केले आहे.
मारोडा ग्रामपंचायतचे सदस्य नंदा बोरकुटे या संयुक्त कुटुंबात राहतात. त्यांचे सासरे हिरामण बोरकुटे व त्यांचे दोन भाऊ देवाजी, गोविंदा तसेच मारोडा ग्रामपंचायत सदस्य शेषराव जुवारे यांचे वडील नानाजी जुवारे यांनी सुद्धा मारोडा तलाठी साजा क्रमांक 19 शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून 1990-91 पासून पीक घेत आहेत, अशी तक्रार 21 जून 2021 ला केली होती. सदर प्रकरणाची चौकशी करून तहसीलदार चामोर्शी यांनी 2 जून 2022 ला ग्रापं सदस्या नंदा बोरकुटे यांचा अहवाल सादर केला असता त्या अहवालामध्ये भूमापन क्रमांक 20/1 आराजी 1.46 हेक्टर आर व शेषराव जुवारे यांचा अहवाल तहसीलदार चामोर्शी यांनी 29 जून 2022 ला सादर केला. त्यामध्ये तलाठी साजा क्रमांक 19 भूमापन क्रमांक 92 आराजी 0.64 आर ही शासकीय वन विभागाची जमीन त्यांच्या कुटुंबातील सहधारकांच्या ताब्यात व कब्जात आहे. सदर अतिक्रमण जागेवर वहिवाट सुरू ठेवून धान पिकाचे उत्पन्न घेऊन उपभोग घेत आहेत. तहसीलदारांच्या अहवालानुसार नंदा बोरकुटे व शेषराव जुवारे यांनी शासकीय जमिनीवर स्वतःचा कब्जा वहिवाट कायम ठेवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चा मुंबई अधिनियम क्रमांक 3 चे कलम 14 (1) (ज 3) चा भंग केल्याचे निष्कर्ष प्रत पोहोचलो आहे. उक्त अधिनियम कलम 16 (2) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी यांनी नंदा बोरकुटे तसेच शेषराव जुआरे यांचे ग्रामपंचायत सदस्य रद्द करण्याचे आदेश 7 सप्टेंबर 2022 रोजी जाहीर केले आहेत. तसेच तक्रारदाराचा अर्ज मान्य करण्यात आला असून दोन्ही सदस्यांचे पद रिक्त झाल्याचे घोषित करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
0 Comments