गांधी' नावाचा अजरामर विचार जेव्हा 'लंडन'ला भेटतो....lokpravah.com



भारतानंतर जगातील कोणत्या भागात तुम्हाला राहायला आवडेल ? असे जर कोणी विचारले तर त्याचे उत्तर मी 'लंडन' देईल, असे महात्मा गांधीजी १९०९ साली म्हणाले होते. लंडन येथील संसद चौकात केवळ एकमेव भारतीय व्यक्तीचा पुतळा देशाचा गौरव वाढवत आहे, ती व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी. 'मोहनदास करमचंद गांधी ते महात्मा गांधी' हा प्रवास नक्कीच साधासुधा नाही. नव्हे तर या प्रवासाने जगाला वेड लावले. गांधीजींना शतकानंतरही वेळोवेळी कितीही मारण्याचा कोणी प्रयत्न केला तरी 'गांधी मरत का नाही?' याचे उत्तर इथे सापडते. 


प्रख्यात स्कॅाटिश शिल्पकार फिलिप जाँनसन यांनी हा ९ फुट उंचीचा तांब्याच्या धातूपासून गांधीजींची विचारउंचीची दिव्य प्रेरणा जपण्यासाठी त्यांचा स्मृती पुतळा तयार केला आहे. महात्मा गांधी हे साऊथ आफ्रिकेतून भारतात परतण्याच्या घटनेला २०१५ ला १०० वर्षे पूर्ण झाली. या ऐतिहासिक पार्श्वभुमीवर हा पुतळा येथे उभारण्यात आला, हे विशेष. 


साधारण १८८८ साली कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी महात्मा गांधी लंडन शहरात आले होते. सुरुवातीला २० बरोन कोर्ट रोड येथे त्यांचे वास्तव्य होते. त्यानंतर चार्ल्स चौक केन्सिगटन व बेवाटर भागात गांधीजी राहिले. लंडनला येताना गांधीजींनी त्यांच्या आईला एक वचन दिले होते, “मी विलायतेत शिक्षण घेतांना दारु, मांसाहारी खाद्य किंवा महिला यापैकी कोणतेही व्यसन करणार नाही.” लंडन शहरात दारु व मांसाहारी पदार्थ पावलोपावली उपलब्ध आहे. येथील बहुतांश लोकांचा आहार तसा मांसाहारीच. या वातावरणात मनावर नियंत्रण ठेवून गांधींनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. मी मांसाहारी असलो तरी अन्य दोन बाबतीत गांधींच्या मूल्यांचे पालन लंडन शहरात करत आहे. 


लंडन येथून कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर काही काळ ते भारतात राहिले. नंतर १८९३ साली वकिली करण्यासाठी गांधीजी साऊथ आफ्रिकाला गेले. दरम्यान आफ्रिकेतील प्रेटोरिया येथे एका केसच्या कामानिमित्त जाण्यासाठी फस्ट क्लासचे तिकिट काढून गांधीजी रेल्वेने प्रवास करू लागले. त्यावेळी काही वर्णद्वेषी लोकांनी 'गांधी हे काळ्या वर्णाचे असून फस्ट क्लासने गोऱ्या वर्णाच्या लोकांसोबत कसा काय प्रवास करू शकतात?' बजावले. त्यांना अपमानास्पद पद्धतीने पीटरमारित्जबर्ग स्टेशनच्या प्लॅटफार्मला हुसकावून लावले. तो क्षण त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पाॅईंट ठरला. पुढे गांधींजींनी वर्णद्वेषाविरुद्ध व ब्रिटिश वसाहतवाद विरोधात लढा उभारला. आज आपला देश विविधतेत एकतेचे मुल्य जगाला शिकवतो, त्याचे श्रेय गांधीजींच्या या पार्श्वलढ्याला जाते. 


ब्रिटिशांनी आपल्यावर १५०-२०० वर्ष राज्य केलं. ब्रिटिश वसाहतवाढीचा विचार केंद्रस्थानी ठेवून आपल्या भारतातील कच्च्या मालाचे, साधनसंपत्तीचे शोषण केले. वर्णाने येथील लोक काळे आहेत म्हणून गुलामीची, दुय्यम दर्जाची वागणूक दिली. काही विकासात्मक बाबी भारतात केल्या असल्या तरी ब्रिटिशांचा कुटिल वसाहतवादाचा विचार मान्य होणारा नव्हता; आजही नाही. गांधींजींनी ब्रिटिशांचा कधीही द्वेष केला नाही. त्यांच्यातील सभ्यता, संस्कृती व सकारात्मक प्रशासनात्मक बाबींचा विरोध केला नाही. मात्र ब्रिटिशांचा विरोध करण्याऐवजी ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धारणा व इतरांवर सहमतीविना राज्य करण्याचा विचार कसा चुकीचा व धोकादायक आहे, हे भारतीयांसह जगाला पटवून दिले.  देशाचा किंवा व्यक्तीचा द्वेष करणे हे कोतेपणाचे लक्षण आहे. द्वेषयुक्त संघर्ष न करता दोषयुक्त लढाई करत विचार परिवर्तनासाठी विरोधी गटाला देखील संवादाची स्पेस (जागा) खुली ठेवणे म्हणजे खरा 'गांधीवाद' आहे, असे मला वाटते. बापूंना लंडनमध्ये विद्यार्थी, वकील ते राजकीय नेता म्हणून भेटतांना मला होत असलेला आनंद व मिळत असलेली प्रेरणा ही अविस्मरणीय आहे.


महात्मा गांधी यांनी ब्रिटिश वसाहतवादाचा प्रखर विरोध केला. भारताच्या स्वातंत्र्यासाठी गांधींनी सत्याग्रही आंदोलने, अहिंसक सविनय कायदेभंगाची मोहीम व चर्चात्मक शांततेचा मार्ग अबलंबला. आजही जगभरात गांधींजींच्या या धोरणांचे अनेक देश पालन करतात.  महात्मा गांधी हे १९३१ ला दुसऱ्या गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी लंडन येथे आले होते. त्यावेळी ब्रिटेनचे अनेक उच्चभ्रू राज्यकर्त्यांशी त्यांची भेट झाली. याबाबतचे फ़ोटोज व दस्त आजही लंडनस्थित ब्रिटिश लायब्ररी येथे जतन केलेले आहे. ते बघताना डोळ्यासमोर जीवंत इतिहास अनुभवता येतो.  जगप्रसिद्ध कलाकार चार्ली चॅपलीन यांची जेव्हा गांधींजींनी लंडन येथे भेट घेतली, तेव्हा या दोघांना बघायला लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. या स्फुर्तीदायी क्षणाचा व्हिडिओ यूट्यूबला उपलब्ध आहे. त्याजागेवर आज मी जाऊन आलो. रोमांचक इतिहासाची साक्ष झाल्यासम प्रत्यक्ष जागेवर गेल्यावर जी अनुभती येते, ती अंगावर शहारे आणणारी असते.


महात्मा गांधीनी ज्या शहरात कायद्याचे शिक्षण घेतले. समकालीन जागतिक नेत्यांच्या भेटी घेतल्या. भारतानंतर ज्या भागावर त्यांचा विशेष लोभ होता, त्या लंडन शहरात गांधींजींच्या जयंतीनिमित्त फिरताना पुस्तकात वाचलेला इतिहास डोळ्यासमोर अनुभवता येतोय, हीच खरी धन्यता आहे. गांधी हा केवळ एक देह नव्हे तर विचार आहे. तो जागतिक कल्याणाचा विचार आहे. हा विचारांची कुणी गोळ्या घालून हत्या करु शकणार नाही. जेव्हा जेव्हा असे प्रयत्न होईल तेव्हा तेव्हा हा विचार पुन्हा मातीत खोलवर रुजत जाईल. हिरवी समृद्धी जगाला जगाला अर्पीत करत जाईल.

बापूंना विनम्र अभिवादन. असेच भेटत राहा.

ॲड. दीपक चटप

दि. ०२.१०.२०२२ (लंडन)

Post a Comment

0 Comments