गडचिरोली पोलिसांचा पुढाकार
गडचिरोली : नक्षल चळवळीमुळे त्रस्त होऊन आत्मसमर्पण करणा-यांसाठी शासन तसेच पोलिस विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. याअंतर्गत गडचिरोली जिल्हा मुख्यालयालगत असलेल्या आत्मसमर्पितांच्या नवजीवन वसाहतीत समर्पितांसाठी उद्यान, गोटूल तसेच घरकुलाची निर्मिती करण्यात आली. नुकताच पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते गोटूल उद्घाटन तसेच घरकूल गृहप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
आत्मसमर्पित नक्षल सदस्यांचे जलत गतीने पुनर्वसन, रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा पोलिस दल सदैव प्रयत्नशिल आहे. याचाच एक भाग म्हणून पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पेनतून व मार्गदर्शनाखाली तसेच जिप मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या योगदानातून आत्मसमर्पितांच्या उभारण्यात आलेल्या नवजीवन वसाहतीत गोटूल व घरकुलाचे बांधकाम करण्यात आले. या इमारतीच्या उद्घाटन व गृहप्रवेश कार्यक्रम नुकताच पार पडला. याप्रसंगी अपर पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक अनुज तारे, जिप सहाय्यक अभियंता सुनील दुर्गे आदी उपस्थित होते. याप्रसंगी आत्मसमर्पितांना कल्याण कार्ड, ई-श्रम कार्ड तसेच आरोग्य कार्डचे वितरण करण्यात आले.
86 सदस्यांना 50 हजाराचे अर्थसहाय्य
आत्मसमर्पितांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी दोन बचत गटाची स्थापना करुन 12 सदस्यांना फ्लोअर क्लिनरचे प्रशिक्षण, 25 महिलांना लोणचे पापड, साबण तयार करण्याचे प्रशिक्षण तसेच 86 सदस्यांना व्यवसाय उभारण्यासाठी 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. यासोबतच जात प्रमाणपत्र, जॉब कार्ड, ई-श्रम कार्ड, जन आरोग्य योजना कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड, घरकूल वितरण करीत आत्मसमर्पितांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न पोलिस विभागाद्वारे केल्या जात आहे.
सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न : पोलीस अधीक्षक
आत्मसमर्पितांना सर्वतोपरी मदत करण्याचा शासन तसेच पोलिस विभागाचा प्रयत्न आहे. शिक्षण तसेच आवडीनुसार सहकार्य केल्या जात आहे. आत्मसमर्पितांना वाटप झालेल्या भूखंडावर अधिकाधिक घरे बांधणे, इतर सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहे. दर महिन्याला विकास कामांचा आढावा घेणे सुरु आहे. आत्मसमर्पितांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न पोलिस व जिल्हा प्रशासनाचा वतीने करण्यात येत असल्याचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी यावेळी सांगितले.
0 Comments