आंदोलनाचा दिला इशारा
अहेरी ; तालुक्यातील मानव विकास मिशनच्या अनेक बसफेऱ्या उशिरा किंवा अर्ध्यापर्यंतच येत असल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे देवलमारी, काटेपल्ली परिसरातील संतप्त विद्यार्थ्यांनी सरपंच लक्ष्मण कन्नाके यांच्या नेतृत्वात बस आगारावर धडक देत आगारप्रमुखांना समस्यांचे निवेदन सादर केले. सोबतच वेळेवर बसफेऱ्या न सोडल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
देवलमारी,काटेपल्ली, इंदाराम, व्यंकटराव, चेरपल्ली येथील विद्यार्थी अहेरी-देवलमरी या मानव विकास मिशनच्या बसने दररोज ये-जा करतात. पावसाळ्यात पूर आहे ही नैसर्गिक बाब सोडली तर चिखल आहे, खड्डे आहेत याही शुल्लक बाबींमुळे अनेकदा बस सोडली जात नाही. तसेच पावसाचे आगमन झाल्यास बस अर्ध्यातच येत असल्याने देवलमरी, काटेपल्ली गावातील शाळकरी मुलांना मोदुमतूर्रा ते देवलमारी असा तीन किलोमीटरचा प्रवास पायदळ करावे लागते. शाळकरी मुलांनी ही समस्या लक्षात आणून दिली असता, सरपंच लक्ष्मण कन्नाके यांनी विद्यार्थ्यांसह बसस्थानकावर धडक दिली. तसेच आगार प्रमुखांना निवेदन सादर करीत अहेरी, महागाव, सुभाषग्राम, आलापल्ली, गोमनी, सुंदरनगर तथा आलापल्ली-जिमलगट्टा मार्गावरील बसफेऱ्या वेळेवर सोडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबविण्याची विनंती केली. सोबतच बस वेळेवर व ठिकाणापर्यंत न सोडल्यास विद्यार्थ्यांसह बसस्थानकात ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
0 Comments