कर्मचा-यांनी रक्तदान करुन गर्भवती महिलेला केली मदत
गडचिरोली : गर्भवती असलेल्या महिलेला प्रसूती करण्यासाठी रक्ताची नितांत गरज होती. मात्र रक्त दुर्मिळ असल्याने मिळण्यास अनेक अडचणी निर्माण होत होत्या. दरम्यान सोशल मिडीयाच्या माध्यमातून लॉयड्स मेटल्स कंपनीच्या अधिका-यांनी ही माहिती कळली. त्यांनी पुढाकार घेत कंपनीमध्ये कार्यरत कर्मचा-याला रक्तदानासाठी प्रोत्साहित केल्याने गर्भवती महिलेला वेळीच रक्त उपलब्ध होण्यास मदत झाली.
सविस्तर वृत्त असे की, सुशिला आऊलवार या गर्भवती महिलेला 'एबी' रक्ताची अत्यंत गरज होती. तिला अहेरी ग्रामीण रुग्णालयातून गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र येथेही रक्त उपलब्ध न झाल्याने त्यांना परत अहेरी उपजिल्हा रुग्णालयात हलिवण्यात आले. सोशल मिडीयाच्या माध्यमातून जिल्ह्यात रक्ताबाबत माहिती देण्यात आली. गर्भवती महिलेच्या रक्तासाठी सतत तीन दिवस सुचिता खोब्रागडे, साई तुलसीगिरी व संजय आक्केवार यांनी अनंत प्रयत्न केले. मात्र दुर्मिळ रक्तगट असल्याने कुठेच मिळेना. सुशिला यांनी याची माहिती टायगर ग्रुप सदस्यांना दिली. या गृपच्या सदस्यांनी पोलिस दलातील सी-60, एसआरपीफ अशा सगळ्या ठिकाणी विचारपूस केली. अखेरीस लॉयड्स मेटल्स कंपनीचे अधिकारी विनोद कुमार यांना संपर्क केले असता, कंपनीत कार्यरत सात कर्मचा-यांचे रक्त एबी असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान विनोद कुमार यांनी तत्काळ कंपनीतील कर्मचारी निरप्राज जाह यांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करीत अहेरी येथील रुग्णालयात पाठविले. त्यांनी वेळीच रक्तदान गर्भवती महिलेची मदत केली. यावेळी विनोद कुमार, संजय अक्केवार व टायगर ग्रुप आलापल्लीचे प्रमुख साई तुलसीगारी, धनराज चक्रमवार उपस्थित होते.
0 Comments