माओवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहादरम्यान 8 भरमार बंदूक पोलिसांच्या स्वाधिन lokpravah.com

स्वेच्छेने बंदुक स्वाधिन करणा-या नागरिकांचा अहेरीचे अप्पर पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या हस्ते सत्कार



 गडचिरोली : दोन ते आठ डिसेंबर दरम्यान माओवाद्यांकडून पीएलजीए सप्ताह साजरा करण्यात येतो. माओवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहादरम्यान अहेरी उपविभागातील  पेरमिली पोलिस स्टेशन हद्दीतील  नागरिकांनी आज 5 डिसेंबर रोजी  8 भरमार बंदूक व 1 बॅरल पोलिसांच्या स्वाधिन केल्या आहेत. स्वेच्छेने स्वत:जवळील बंदुक पोलिसांकडे स्वाधिन करणा-या नागरिकांचा अहेरीचे अप्पर पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात व अप्पर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. सप्ताहादरम्यान अहेरी उपविभागात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे. 

गडचिरोली जिल्ह्यात मोठ़्या प्रमाणावर जंगलक्षेत्र आहे. त्यामुळे येथील दुर्गम व अतिदुर्गम भागातील सामान्य नागरिक आपल्या पारंपरिक शेती व्यवसायासोबतच शिकार करून उदरनिर्वाह करीत असतात. शिकार करण्यासाठी तसेच वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी अनेक सामान्य नागरिक बंदुक बाळगत असतात. अशाच प्रकारच्या वडिलोपार्जित बंदुका व शस्त्रे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांकडे उपलब्ध आहेत. दुर्गम व अतिदुर्गम भागातील नक्षलवादी यांचा बाबीचा फायदा घेऊन सर्वसामान्य जनतेला नक्षल चळवळीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतात. ही बाब लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून अप्पर पोलिस अधीक्षक अभियान अनुज तारे, अप्पर पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनात नागरिकांनी स्वत:जवळ बाळगलेल्या बंदुका स्वेच्छेन जवळच्या पोलिस स्टेशनला स्वाधिन कराव्यात, असे आवाहन करण्यात आले होते. पोलिस विभागाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत उपविभाग अहेरी अंतर्गत येणा-या पेरमिली हद्दीतील गट्‌टेपल्ली, रापल्ले, येरमनार, येरमनार टोला, चंद्रा व कुकडेली गावातील नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या 8 भरमार बंदुक व 1 बॅरल 5 डिसेंबरला अहेरीचे अप्पर पोलिस अधीक्षक यतिश देशमुख व उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या समक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय अहेरी येथे स्वाधिन केल्या. स्वेच्छेन बंदुका स्वाधिन करणा-या नागरिकांचा अहेरीचे अप्पर पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

याकरिता उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या नेतृत्वात पेरमिली उपपोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी धवल देशमुख, पोलिस उपनिरिक्षक सोनवणे, पोलिस उपनिरिक्षक अजिंक्य जाधव, नाईक पोलिस शिपाई केशव गुरनुले, पोलिस शिपाई राहुल खारडे, ब्रिजेश सिडाम, राकेश उरवेते, पंकज दंडिकवार, सुरज करपेत व पेरमिली पोलिस स्टेशनच्या पोलिस पथकांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments