"परीक्षा पे चर्चा" पर्व-6 उपक्रमांतर्गत इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन Painting competition




गडचिरोली, : परीक्षा पे चर्चा-6 या कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व व्यवस्थापनातील माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणेत येणार आहे. या स्पर्धेसाठीचे खर्च निकष व विषयसूची दिली आहे. सर्व माध्यमांच्या शाळांमधील इ.9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी दिनांक 25 जानेवारी 2023 ला सकाळी 9.00 वाजता चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन शिक्षणाधिकारी यांनी केले आहे. स्पर्धा सकाळच्या सत्रामध्ये घेण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी किमान 500 ते 1000 विद्यार्थी एकत्र बसू शकतील उदा. शाळेचे मोठे सभागृह, मैदान, मंगल कार्यालय, समाज मंदिर या ठिकाणी शक्य असल्यास तालुका स्तरावर अथवा केंद्र स्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

याबाबत जिल्हा, तालुकास्तरीय अधिकारी यांनी स्थानिक परिस्थितीचे अवलोकन करुन आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घेण्यात यावा. सदरच्या स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धेकांना प्रोत्साहन पारितोषिक, प्रमाणपत्र यासाठी आवश्यक तरतुदीची उपलब्धता स्थानिक पातळीवर उपलब्ध करुन घेण्यात यावी. राज्यातील ज्या ठिकाणी निवडणुक आचारसंहिता लागु करण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी आचारसंहिता नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

तालुकास्तरीय स्पर्धेचे ठिकाण पुढीलप्रमाणे आहेत यात 1) गडचिरोली- कारमेल हायस्कुल, गडचिरोली, 2) धानोरा- जिल्हा परिषद हायस्कुल, धानोरा, 3) आरमोरी- महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय, आरमोरी, 4) देसाईगंज- आदर्श इंग्लीश हायस्कल, देसाईगंज 5) एटापल्ली- जिल्हा परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय, एटापल्ली 6) चामोर्शी- शिवाजी हायस्कुल, चामोर्शी 7) कुरखेडा- शिवाजी हायस्कुल, कुरखेडा 8) कोरची- पार्वतीबाई विद्यालय, कोरची 9) अहेरी- मॉडेल स्कुल, अहेरी 10) भामरागड- कस्तुरबा गांधी बालीका विद्यालय, भामरागड 11) सिरोंचा – जिल्हा परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय, सिरोंचा 12) मुलचेरा- शहीद वीर बाबुराव शेडमाके माध्यमिक विद्यालय, मुलचेरा.

गटशिक्षणाधिकारी व संबंधित तालुकास्तरीय केंद्राचे माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक हे नोडल अधिकारी म्हणून सदर स्पर्धेचे कामकाज पाहणार आहेत.  तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा पर्यंत सदर स्पर्धेची माहिती देण्यात आली आहे. मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहभागी शाळेच्या मुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांना ड्राईग सिट ए-4 साईज मध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 

खर्च निकष यात चित्रकला स्पर्धेतून सर्वोत्कृष्ट प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना व उत्तेजनार्थ पंचवीस विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या बक्षिसांचा खर्च कमाल मर्यादा रुपये 2500/- प्रति तालुका आहे. स्पर्धेसाठी विषय - G-20 जागतिक विश्वगुरु बनण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल,आझादी का अमृत महोत्सव, सर्जिकल स्ट्राईक, कोरोना लसीकरण मध्ये भारत नंबर-1, पंतप्रधान जनसेवच्या विविध योजना, स्वच्छ भारत अभियान, आत्मनिर्भर भारत, आंतरराष्ट्रीय योगदिन मोदीजीनी वेधले जगाचे लक्ष, बेटी बचाव बेटी पढाव, चुलीतल्या धुराच्या त्रासापासून मुक्त महिला मोदीचा संवेदनशील निर्णय, असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद,गडचिरोली यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments