खा. अशोक नेते यांची आंदोलनास्थळाला भेट
गडचिरोली : आलापल्लीचे वन परिक्षेत्राधिकारी योगेश शेरकर यांच्या कालावधीत झालेल्या कामाची चौकशी करुन निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी पंचायत राज विकास मंचने आंदोलन अधिक तीव्र केले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून 18 ऑगस्टला मंचचे जिल्हाध्यक्ष योगाजी कुडवे यांच्या नेतृत्वात 'भीक मांगो' आंदोलन पुकारण्यात आले.
आलापल्ली वनविभागातील कामाची चौकशी करुन संबंधित दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, यासाठी 9 ऑगस्टपासून वनसंरक्षक कार्यालयासमोर आंदोलन पुकारले जात आहे. मात्र, वनविभागाने कोणतीही ठोस कारवाई न करता वरिष्ठांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत संबंधितांना अभय दिला जात असल्याचा आरोप करीत योगेश कुडवे यांनी आंदोलन अधिक तीव्र केले आहे. सदर आंदोलन टप्याटप्यात केले जाणार असून याच अनुषंगाने शुक्रवारी भीक मांगो आंदोलन पुकारण्यात आले. याअंतर्गत हातात कटोरा घेऊन दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत शहरातील मुख्य मार्गावरुन भीक मागण्यात आली. भीक स्वरुपात मिळालेली रक्कम पोस्टाने वनसंरक्षकांना पाठविण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्ते योगाजी कुडवे यांनी दिली आहे. या आंदोलनात योगाजी कुडवे, रविंद्र सेलोटे, निलकंठ संदोकर, चंद्रशेखर सिडाम, विलास भानारकर, शंकर ढोलगे सहभागी झाले होते.
.......
खा. अशोक नेते यांची आंदोलनास्थळाला भेट
मागील दहा दिवसांपासून मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर पुकारलेल्या आंदोलनाची दखल घेत खा. अशोक नेते यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळ गाठित आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी वरिष्ठ वनाधिका-यांशी संवाद साधित उचित कारवाई करण्याची सूचना केली. तसेच या प्रकरणी वरिष्ठ स्तरावरुन पाठपुरावा करण्याची ग्वाही, त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिली. मात्र जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.
0 Comments