भाजपचे खासदार असणाऱ्या मतदार संघात भाजपचेच उमेदवार : प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुतोवाच




गडचिरोली : एनडीएच्या महायुतीत १२ घटक पक्ष असले तरीही राज्यात ज्या लोकसभा मतदार संघात सध्या भाजपचे खासदार आहेत, त्या मतदार संघातून भाजपचेच उमेदवार निवडणूक लढतील, असे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. त्यामुळे नव्या राजकीय समिकरणात गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघ महायुतीत कोणाकडे जाणार यावरून सुरू झालेल्या चर्चांना एक प्रकारे ब्रेक लागला आहे. महाजनसंपर्क अभियानासाठी गडचिरोलीत आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते.

भाजपच्या महाजनसंपर्क अभियानासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे बुधवारी गडचिरोलीत आले होते. यावेळी इंदिरा गांधी चौकात आतिषबाजी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी त्यांनी मार्केट लाईनमधील व्यापारी आणि नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर लोकसभा क्षेत्रातील गडचिरोली, अहेरी आणि आरमोरी या तीनही विधानसभा मतदार संघातील प्रत्येकी १०० अशा ३०० कार्यकर्त्यांशी संवाद साधून कामांचा आढावा घेतला.

यावेळी खासदार अशोक नेते, विदर्भ संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, ज्येष्ठ सहकार नेते अरविंद्र सावकार पोरेड्डीवार, माजी आमदार अतुल देशकर, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, लोकसभेचे निवडणूक प्रभारी किशन नागदेवे, बाबुराव कोहळे, रविंद्र ओल्लालवार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर खा.अशोक नेते यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

भाजपने ज्या पद्धतीने या मतदार संघात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, त्यावरून हा मतदार संघ भाजपकडेच राहणार हे निश्चित झाले आहे का, असा प्रश्न बावनकुळे यांना विचारला होता. त्यावर त्यांनी भाजपचे खासदार असणारे मतदार संघ भाजपकडेच राहतील. यासंदर्भात कोणी काही सांगत असले तरी त्यावर उत्तर दिलेच पाहिजे असे नाही, असे म्हणत त्यांनी गडचिरोली-चिमूर मतदार संघाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र यासंदर्भातील सर्व निर्णय पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाकडून घेतला जातो असेही ते म्हणाले. आपण राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदार संघात महाजनसंपर्क अभियान राबविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments