Baburao shedmake १८५७ च्या लढ्यातील स्वातंत्र्ययोद्धा क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके





देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी प्राणाची आहूती दिली. मात्र अजूनही अनेक क्रांतिकारकांचे बलिदान इतिहासाच्या पानांवर उपेक्षित, दुर्लक्षित आहे. चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील थोर आदिवासी क्रांतिकारक शहीद वीर बाबूराव पुल्लेसूर शेडमाके यांनी १८५७ चा लढा 'जंगोम सेना' उभारुन इंग्रजांना 'सळो की पळो' केले. या महान क्रांतीकारकांचा 166 वा शहिद दिन.....

••••


आदिवासीबहुल चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात पुर्वी पारंपारीक गोंड साम्राज्याचे वर्चस्व होते. अठराव्या शतकात या साम्राज्यावर इंग्रजांनी सत्ता मिळवली. इंग्रजांची येथील जनतेवर अन्यायकारक सावकारशाही सुरू झाली. नापीकी आणि दुष्काळामुळे येथील शेतकरी हवालदीन झाला असतांनाही शेतक-यांकडून वसूली करणे सुरुच होते. हे उघड्या डोळ्यांनी बघणारे क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांनी इंग्रजांच्या जुलूमशाहीविरुद्ध बंड पुकारले. आपल्या सवंगड्यांना सोबत घेवून २४ सप्टेंबर १८५७ रोजी 'जंगोम सेना' उभी केली. याच जंगोम सेनेने इंग्रजांना 'सळो कि पळो' करुन या आदिवासीबहूल भागात स्वातंत्र्याची पहिली क्रांतीज्योत पेटवली.

शहीद वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांचा जन्म १२ मार्च १८३३ रोजी चांदागडातील मोलमपल्ली (अहेरी, जि.गडचिरोली) येथे झाला. मध्यप्रदेशातील रायपूर येथे चौथीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले. वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत ते युद्धनितीत माहीर झाले, त्यासाठी त्यांनी सामाजिक नीतीमुल्ये, दांडपट्टा, तलवार, भालाफेक, गुल्ह्यार असे प्रशिक्षण घेतले. आपल्या सवंगड्यांना सोबत घेवून त्यांना अन्यायाची जाणीव करुन दिली. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी परिसरात जनजागृती केली. जंगोमसेनेत सहभागींना प्रशिक्षण दिले. 'जंगोम' या शब्दाचा गोंडी भाषेत अर्थ क्रांती, जागृती. ही क्रांती, जागृतीची मशाल घेवून स्वातंत्र्याचे पहिले रणशिंग या आदिवासीबहुल भागात क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांनी इंग्रजांविरुद्ध फुंकले.


इंग्रजांशी पहिले युद्ध अन् क्रांतीचे रणशिंग

चांदागड शेजारी राजगड परंगणा परिसराची इंग्रजांशी युद्ध छेडण्यासाठी बाबुरावांनी पहिल्यांदा निवड केली. रामशहा हा सरदार येथे इंग्रजांचा हस्तक होता. आपल्या सैन्यानिशी ७ मार्च १८५८ रोजी त्यांच्यावर हल्ला करुन रामशहाला वीर बाबुरावांनी ठार केले. येथे नवनियुक्त कॅप्टन क्रिक्टन याला राजगड परंगणी आपल्या हातून गेल्याने धक्का बसला. हा बाबुरावांचा पहिला क्रांतिकारी विजय ठरला. या घटनेने ब्रिटीशांना हादरा बसला. वीर बाबुरावांच्या कारवायावर रोख लावायला कॅप्टन क्रिक्टनने चांदागडाहून इंग्रज सैन्य पाठवले. नांदगाव घोसरी येथे इंग्रजांशी पहिली लढाई जंगोम सेनेची झाली. यात इंग्रज सैन्याचा जंगोम सेनेने दारुन पराभव केला. घोटचे जमीनदार व्यंकटराव आपल्या सैन्यासह वीर बाबुरावांच्या मदतीला धावून आले. या विजयाने जंगोम सेनेचा आत्मविश्वास बळावला. मात्र इंग्रज सेना पुन्हा परतून येईल व युद्ध पुकारेल, हे वीर बाबुरावांनी जाणले होते. वीर बाबुराव व सैन्य गडीसुर्ला टेकडीवर आश्रयासाठी थांबले. तेथे दगडांचा ढीग करण्यात आला. बैलबंडीचे चाके आसपासच्या गावांतून गोळा करण्यात आले. सकाळी साडेचारच्या सुमारास इंग्रज सैन्यानी टेकडीला घेराव घातला. टेकडीच्या दिशेने बंदुकीच्या फैरी सुरू झाल्या. वीर बाबुराव व जंगोम सेनाही दगडांचा आडोसा घेवून इंग्रज सैन्यावर वार करत रक्तबंबाळ करत होते. इंग्रज सैन्यांनी भांबावून पळ काढला. अनेक इंग्रज सैनिक मारले गेले. इंग्रजांच्या हस्तकांना टेकडीखाली उतरुन जंगोम सेनेने पकडले. त्यांच्याकडील तोफा, बंदुका जप्त केल्या. इंग्रज हस्तकांनी बळजबरी करुन नागरिकांची लुटमार करुन उभे केलेली धान्याची कोठारे वीर बाबुरावांनी हस्तगत केली. ती धान्याची कोठारे लोकांसाठी खुली केली. वीर बाबुरावांनी इंग्रजांच्या बाजूने राहून फितुरी करणा-यांना चांगलाच धडा शिकवला व राज्यातून पळवून लावले. यामुळे जनतेत बाबुरावांना प्रतिसाद वाढत गेला. देशाभिमान जागृती होवून क्रांतीसाठी पोषक वातावरण तयार होत गेले.


• वीर बाबुरावांचे युद्ध आणि इंग्रजांना हादरे

वीर बाबुराव आपल्या सैन्यासह १९ एप्रिल १८५८ रोजी समनापूर गावात मुक्कामी होते. येथील परगणाचे जमीनदार राजेश्वरराव व नरसिंहराव राजगोंड. वीर बाबुरावांच्या क्रांतीने प्रेरीत होवून त्यांनी आपल्या सेनेचे नेतृत्व बाबुरांवाकडे सोपवले. इंग्रजांचे वर्चस्व झुगारुन खंडणी बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. जमीनदार, मोकासदारांना बोलावून याबाबत सूचना देण्यात आली. इंग्रजांना येथून हकलावून गुलामगिरीतून मुक्त व्हावे व स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकावे हेच ध्येय वीर बाबुरावांसह परिसरात गुंजू लागले. दक्षिण गोंडवनात बाबुरावांची सेना स्वातंत्र्य संग्रामाकरिता जनजागृतीसाठी फिरत होती. टोळ्यांनी फिरणारी ही सेना इंग्रजांच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवत होती. सगनापुरच्या परिसरात इंग्रज सेना असल्याची माहीती गुप्तहेरांकडून वीर बाबुरावांना मिळाली. सगनापूर शिवेत आलेल्या इंग्रज सैन्यावर वीर बाबुरावांच्या सेनेने जोरदार हल्ला केला. तलवारी, बंदुका, गुल्ह्यारिने लढाई सुरू केली. बांबुरावांच्या थोड्या व हुशार सेनेपुढे इंग्रज सैन्यांनी नांगी टाकली. येथेही इंग्रज सैन्यांचा दारुन पराभव करत राजगढ, नांदगाव घोसरी, गडीचुर्ला, समनापूर परंगणावर बाबुरावांनी आपले गोंडीयन साम्राज्य प्रस्थापित केले. या विजयानंतर बाबुरावांनी आपला मोर्चा बामनपेठकडे वळवला. बामनपेठच्या जंगलात इंग्रज सैन्य असल्याची माहीती मिळाली. जंगोम सेनाही छुप्या पद्धतीने जंगलात, झाडावर बसून इंग्रज सैन्याचा मागोवा घेत होते. २७ एप्रिल १८५८ रोजी मध्यरात्री इंग्रज सैन्यावर हल्ला करुन विजय मिळवला. चांदाचे कलेक्टर कॅप्टन क्रिप्टन यांनी चांदा ते सिरोंचा पर्यंत टेलीफोनची तारे लावण्यासाठी लाॅर्ड डलहौसीच्या आदेशाने ऑपरेटर गार्ट लॅन, हाॅल व सहकारी पीटर यांची नेमणूक केली होती. त्यांना चिचगुडीला पाठवले. याचा फटका वीर बाबुरावांच्या क्रांतीलढ्यास बसणार होता. २९ एप्रिल १८५८ रोजी वीर बाबुरावांनी आपल्या सैन्यासह मध्यरात्री चिचगुडी कॅम्पवर हल्ला चढवून गार्ट लॅन व हाॅल यांना ठार केले.


• राणी व्हिक्टोरियाचे बाबुरावांना 'जिंदा या मुर्दा' पकडण्याचे आदेश

गार्ट लॅन व हाॅल या दोन इंग्रज अधिका-यांच्या मृत्यूने जिल्हाधिकारी कॅप्टन क्रिक्टनला जोरदार हादरा बसला. ही वार्ता थेट इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरिया यांच्यापर्यंत पोहोचली. राणी व्हिक्टोरियाने वीर बाबुरावांना 'जिंदा या मुर्दा' पकडण्याचे आदेश दिले. त्यासाठी नागपूरचे कॅप्टन सेक्सपिअरला बोलावून यासाठी विशेष नेमणूक केली. कॅप्टन सेक्सपिअर यांना वीर बाबुराव असे हाती लागणार नाही, त्यांना त्यांच्याच पद्धतीने डावपेच खेळून पकडावे लागेल, असे नियोजन केले. त्यासाठी अहेरीच्या राणी लक्ष्मीबाईकडे खलीता पाठवण्यात आला, मात्र त्याचा जंगोम सेनेवर कुठलाही परिणाम झाला नाही. यानंतर पुन्हा युद्ध झाले. यात काही सैनिकांना वीरगती मिळाली, मात्र वीर बाबूराव व घोटचे महाराजा व्यंकटराव हाती लागले नाही. घोटच्या युद्धानंतर जंगोम सेनेत फितूरीचे प्रमाण वाढले. यात सहका-यांच्या मालमत्ता जप्त झाल्या. राजे व्यंकटरावांनी जंगलाचा आश्रय घेतला, त्यामुळे वीर बाबुराव एकटे पडले.


• आपल्याच माणसांचा दगाफटका आणि वीर बाबुरावांना अटक

अहेरीच्या राणी लक्ष्मीबाईंना कॅप्टन सेक्सपिअरने आमीषे दाखवली. यात लक्ष्मीबाई आमीषाला बळी पडल्या. वीर बाबुरावांना पकडण्यासाठी त्या इंग्रजांना सहकार्य करु लागल्या. लक्ष्मीबाईकडून बाबूरावांना पकडण्यासाठी रोहील्यांची सेना पाठवण्यात आली. वीर बाबुराव भोपाल पटनम येथे काही लोकांच्या आग्रहाखातर थांबले होते. मध्यरात्री झोपले असताना रोहिल्यांच्या सेनेनी त्यांना पकडले. बाबुरावांनी त्यांना कुठलाही विरोध केला नाही. उलट इंग्रजांविरुद्ध लढण्याचा उपदेश केला. 'मी माझ्या मातृभूमीसाठी लढतो आहे, मला इंग्रजांच्या स्वाधीन करुन तुम्ही स्वातंत्र्य व्हाल का?' हा उलट प्रश्न वीर बाबुरावांनी रोहील्यांच्या सेनेला केला. त्यांचे मतपरिवर्तन झाले. २४ जून १८५८ रोजी ते पुन्हा एकदा इंग्रजांच्या तावडीतून पसार झाले. वीर बाबुराव निसटल्याची वार्ता चांदाचे जिल्हाधिकारी कॅप्टन कटन व सेक्सपिअर यांना कळताच त्यांचे डोके भडकले. त्यांनी पुन्हा उलटा डाव खेळला. इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी राणी लक्ष्मीबाईला प्रोत्सोहन देत वीर बाबुराव शेडमाके यांना पाठींबा देण्यास भाग पाडले. आपले सैन्य त्यांच्यात मिसळवले. वीर बाबुरावांची सर्व खबर राणी लक्ष्मीबाई इंग्रजांना देत. १८ ऑक्टोबर १८५८ रोजी राणी लक्ष्मीबाईने वीर बाबुरावांना जेवणाचे आमंत्रण दिले. आपल्या नातलगावर विश्वास ठेवून वीर बाबुराव शेडमाके जेवणासाठी आले. जेवण करतांनाच कॅप्टन सेक्सपिअर यांनी वीर बांबुरावांना पकडले. आपल्याच नातलगांनी बाबुरावांना दगा दिला.


• चंद्रपूरच्या कारागृहात फाशी मात्र इतिहासाची पाने अजूनही कोरीच

वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांना फितुरीने पकडण्यात इंग्रजांना यश आले. त्यांच्या हातापायाला लोखंडी बेड्या लावण्यात आल्या. त्यांना चांदाचे म्हणजे आताचे चंद्रपूरचे कारागृहात आणण्यात आले. त्यांना शिक्षा देण्यासाठी विशेष न्यायालयाची व्यवस्था कारागृहातच करण्यात आली. यावेळी त्यांच्याकडून बयान देणारा कोणीही वकील नव्हता. भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हा माझा लढा असल्याची साक्ष न्यायालयात वीर बाबुरावांनी दिली. यावेळी त्यांना बघण्यासाठी कारागृहात जनसमुदायांची अफाट गर्दी झाली होती. २१ ऑक्टोबर १८५८ रोजी कारागृहासमोरील पिंपळाच्या झाडावर त्यांना फाशी देण्याची व्यवस्था करण्यात आली. जेलर त्यांच्या चेह-यावर काळा पडदा टाकण्यास पुढे आले, मात्र त्यांनी मनाई केली व हसत हसत देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर चढले. शहीद वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके हे केवळ २५ वर्षे जगले. केवळ २५ वर्षाच्या या क्रांतियोद्ध्याने इंग्रजांना घाम फोडला. स्वातंत्र्यासाठी रणसंग्राम पेटवला. मात्र चंद्रपूर-गडचिरोलीतील या शहीद वीर भुमीपुत्र बाबुरावांच्या स्वातंत्र्याच्या क्रांतीलढ्याचा इतिहास इतिहासाच्या पानात अजूनही धूसरच आहे.

• अविनाश पोईनकर, चंद्रपूर
( लेखक सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक व कार्यकर्ते आहेत.)

Post a Comment

0 Comments