जिल्ह्याच्या दक्षिण भागातही वाघाचा हल्ला

 म्हैस ठार;  मवेली शेतशिवारातील घटना


गडचिरोली : शेतशिवारात चराई करीत असलेल्या म्हशीवर वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना शुक्रवारी तालुक्यातील नागूलवाडी नियतक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या मवेली गावालगतच्या शेतशिवारात घडली. या घटनेने परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे.

जिल्ह्याच्या मध्य व उत्तर भागात वाघाचे हल्ले वाढले असतांनाच आता दक्षिण भागातही वाघाने मोर्चा वळविल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एटापल्ली वनपरिक्षेत्रातील नागूलवाडी नियतक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या मवेली येथील मंकेश्वर मडकाम यांची म्हैस जंगलालगतच्या शेतशिवारात चराई करीत असतांना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हल्ला चढवून म्हशीला ठार केले. याची माहिती गाव पाटील शिवाजी मट्टामी यांनी क्षेत्रसहाय्यक भडके तसेच वनरक्षक यांना दिली. घटनेची माहिती प्राप्त होताच वनकर्मचा-यांनी घटनास्थळ गाठित पंचनामा केला. यावेळी शेतशिवाराच्या दक्षिण भागात वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्याने सदर हल्ला वाघानेच केल्याचे स्पष्ट झाले. वनविभागाने सदर जंगल परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. मात्र वाघाच्या या हल्ल्याने या परिसरातील दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments