आशा, गटप्रवर्तकांना दिवाळी भेट; आशांच्या मानधनात 7 हजार व गटप्रवर्तकांना 6200 रुपये वाढ


2 हजार रुपयांची दिवाळी भेट देण्याची घोषणा


गडचिरोली : महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांना 7 हजार तर गट प्रवर्तकांना प्रत्येकी 6200 रुपयांची घसघशीत मानधन वाढ तसेच प्रत्येकी 2 हजार रुपयांची दिवाळी भेट देण्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्र्यांनी केली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील आशा, गटप्रर्तकांनी स्वागत केले असून दिवाळीपूर्वीच ही घोषणा झाल्याने आशा, गटप्रवर्तकांची दिवाळी गोड होणार आहे.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ग्रामस्तरावर आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आशा स्वयंसेविकांचा उपयोग होतो. ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यांच्यामध्ये आशा या मध्यस्थीचे काम करतात. गैरआदिवासी भागात 1500 लोकसंख्येमागे एक आशा तर आदिवासी भागामध्ये 1000 लोकसंख्येमागे एक आशा नियुक्त करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छता, लसीकरण यांचे महत्व पटवून देण्यासाठी त्याचप्रमाणे ताप, लहान-मोठ्या जखमा यावरील प्राथमिक स्वरुपाचे उपचार करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येते. गोळ्यांचे वाटप करण्याची कामे आशा सेविकांमार्फत केली जातात. त्याचप्रमाणे आरोग्य विषयक गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्यांची माहिती संबंधित यंत्रणेला देण्याची जबाबदारीही आशांवर असते. ग्रामीण भागातील आशा या स्वयंसेवक पद्धतीने जरी काम करीत असल्या तरी त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना प्रोत्साहनपर वेतन, भत्ते देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण महिलांना बाळंतपण सुखरुप प्रसुती, स्तनपान, लसीकरण, गर्भप्रतिबंधक उपाययोजना आदी आरोग्य विषयासंबंधी मदत व मार्गदर्शन करण्यास आशा सदैव तत्पर असतात.
इन्फो.....
संयुक्त कृती समितीसोबत चर्चा
महाराष्ट्र शासनाने दखल न घेतल्याने संयुक्त कृतीसमितीद्वारे आशा, गट प्रवर्तकांनी 18 ऑक्टोबरपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. त्या अनुषंगाने मुंबई येथे 1 नोव्हेंबर रोजी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आयुक्त धीरजकुमार, आरोग्य प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य अतांत्रिक संचालक सुभाष बोरकर यांच्या उपस्थितीत आशा, गट प्रवर्तकांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत  आरोग्य मंत्र्यांनी आशांना दरमहा 7 हजार, गट प्रवर्तकांना 6200 रुपये वाढ करण्यात येईल. तसेच दीपावली भाऊबीज भेट 2 हजार देण्यात येतील. आशांना मोबाईल रिचार्ज भत्ता 100 रुपयांवरून 300 रुपये, जननी सुरक्षा योजनेमध्ये सरसकट लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. 

इन्फो....
18 व्या दिवशीही आंदोलन सुरुच
दरम्यान, आशा, गटप्रवर्तकांना कर्मचा-यांचा देण्यात यावा, त्याप्रमाणे वेतन लागू करावे, उच्च शिक्षित गट प्रवर्तकांना किमान वेतन द्यावे, यासाठी कृती समिती आग्रही आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत संप सुरुच ठेवण्याचा निर्धार आशा, गटप्रवर्तकांनी केला असून गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयटकच्या नेतृत्वात सुरु असलेले आंदोलन 18 व्या दिवशीही कायम होते.

Post a Comment

0 Comments