विविध मागण्यांना घेऊन जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार संपावर




गडचिरोली : शासकीय धान्य दुकानदारांच्या विविध समस्या सोडविण्यात याव्यात या मागणीला घेऊन अखिल महाराष्ट्र शासकीय धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक महासंघाने आज, 1 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन पुकारले. या आंदोलनात जिल्ह्यातील अधिकृत शासकीय धान्य दुकानदार व रॉकेल परवानाधारक संघटनेच्या दुकानदारांनीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. 

गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करीत आहे. पंतप्रधानांनी पुढील 5 वर्षांसाठी मोफत धान्य वाटप करण्याची घोषणा केली आहे. ज्याचे महासंघाकडून स्वागत करण्यात येत आहे. पण दुसरीकडे, सार्वजनिक वितरण प्रणालीच्या शेवटच्या दुव्यावर आणि शेवटच्या घटकापर्यंत व शासकीय धान्य दुकानदारांना वाढत्या महागाईनुसार योग्य मार्जिन देण्याच्या अनिश्चिततेमुळे राज्यातील शासकीय धान्य दुकानदार आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे राज्यभरातील शासकीय धान्य दुकानदारांमध्ये असंतोष व्यक्त होत होता. त्यामुळे विविध मागण्यांना घेऊन राज्यभरासह आज जिल्ह्यातील शासकीय धान्य दुकानदारांनी आंदोलन पुकारले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले. आंदोलनात जिल्हाभरातील बहूसंख्य शासकीय धान्य दुकानदार उपस्थित होते. 

इन्‍फाे...........

या मागण्यांचा समावेश 

आंदोलकांच्या मागण्यांमध्ये कालबाह्य झालेल्या 2 जी ई-पास मशीन त्वरित बदलून 4 जी ई-पास मशीन उपलब्ध कराव्यात, अपवादात्मक परिस्थितीत राज्यात 1 मे 2018 पासून मॅन्युअल पद्धतीने आधार सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्य वितरण करण्यात यावे, पासद्वारे कार्ड नामांकन प्रक्रिया ऑनलाइन करण्यासाठी नवीन आणि सुधारित कार्यपद्धती विकसित करावी, कार्ड नॉमिनी प्रक्रिया अधिक सुलभ करावे, 32 वर्षांहून अधिक काळ प्रचलित असलेले सर्व नियम बदलून सरकारी धान्य दुकानदारांसाठी नवीन स्वतंत्र धोरण ठरवावे, शासकीय धान्य दुकानदारांना मार्जिनची रक्कम वाटप करण्याच्या सदोष पद्धतीमुळे संपूर्ण मार्जिनची रक्कम दुकानदारांना वेळेवर दिली जात नाही. त्यामुळे या पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासह विविध मागण्यांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments