सभासद नोंदणी करणार
गडचिरोली : शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई जराते यांच्या नेतृत्वात गडचिरोली शहरातील प्रत्येक वाॅर्डात पक्ष शाखांची स्थापना करण्यात येणार असून १३ ते २७ फेब्रुवारी दरम्यान हर घर जोडो अभियान राबविणार आहे. या अभियाना अंतर्गत विद्यार्थी, युवक, महिला व पुरुषांना पक्षाशी जोडण्यासाठी पक्ष सभासद नोंदणी करण्यात येणार आहे.
याबाबत शेतकरी कामगार पक्षाने प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, १३० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाच्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ८० कोटी लोकांना ५ किलो मोफत राशन दिल्याचा आणि २५ कोटी जनतेला गरिबीतून मुक्त केल्याचा दावा अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी २०२४ दरम्यान केला आहे. हा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा खोटारडेपणा देशातील सर्वसामान्य गरीब, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी, युवक, बेरोजगार, छोटे दुकानदार, नोकरदारांची, गळचेपी करणारा आहे. शेतीमालाला योग्य हमीभाव, आरोग्य, शिक्षणावरील कमी केलेली तरतूद, गरिबांना आणखी गरिबीच्या खाईत लोटणार आहे. सर्व क्षेत्रातील पराकोटीचे खाजगीकरण येणाऱ्या पिढ्यांच्या उरावर बसणार असून गरिबांच्या मुलांना शिक्षण, आरोग्य, नोकरी, रोजगार मिळणे बंद होणार आहे.
या संपूर्ण अराजकतेविरुद्ध देशातील प्रमुख विरोधी असलेला काँग्रेस पक्ष जनतेसोबत लढा उभारायचा सोडून ईडी-सीबीआय च्या धाकाने मिळमिळीत भूमिका घेऊन शांत बसलेला आहे. शिवसेना - राष्ट्रवादी यांनाही पक्ष फुटीने ग्रासलेले असून जनतेच्या प्रश्नांपेक्षा स्वतःच्या अस्तित्वाच्या संघर्षात गुरफटले आहे. देशापातळीवरील या परिस्थितीमुळे आपल्या गडचिरोली शहरातही त्याची झळ बसणार असून दुकानांमध्ये काम करणारे नोकरदार, कामगार, मजूर, छोटे दुकानदार, व्यापारी, गृहिणी, युवक, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नसल्याची टिका शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.
शहरातील फुटपाथ दुकाने, घरकुल, अतिक्रमणे कायम करून प्रॉपर्टी कार्ड मिळणे, रस्ते, नाल्या, पिण्याच्या पाण्याची सोय यासारख्या समस्यांचे निवारण होणे आवश्यक आहे. अशा स्थितीत स्वातंत्र्यपूर्व काळापासून सत्तेच्या राजकारणापेक्षा भांडवलदार, कारखानदारां विरोधात सरकारशी सामान्य माणसांसाठी विधिमंडळात आणि रस्त्यावरचा संघर्ष करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली एकत्र येऊन आवाज बुलंद करण्याची आता वेळ आलेली आहे. त्यासाठी गडचिरोली शहरातील गरीब सामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, छोटे दुकानदार, नोकरदार, महिला, विद्यार्थी - बेरोजगार युवकांनी मोठ्या संख्येने आपापल्या वार्ड शाखेचे मोठ्या संख्येने सभासद होऊन एकत्र यावे, असे आवाहन जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्री जराते, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, जिल्हा समितीचे सदस्य डॉ. गुरुदास सेमस्कर, रेश्मा रामटेके, विजया मेश्राम, छाया भोयर, रजनी खैरे, शुल्का बोबाटे, संगिता बोदलकर, अस्मिता लाटकर, धारा बन्सोड, कुसूम नैताम, पुष्पा कोतवालीवाले, योगेश चापले, भीमदेव मानकर, राजकुमार प्रधान, बाबुलाल रामटेके, विनोद उराडे, अंकुश मारभते, भूषण चिंचोलकर यांनी केले आहे.
0 Comments