गडचिरोली : भामरागड वनविभागाच्या अखत्यारितील गट्टा वनपरिक्षेत्रात विविध रस्त्यांच्या बांधकामासाठी माती, मुरुमाचे अवैध उत्खनन करण्यात आले आहे. यास जबाबदार वनविभागाचे अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी 7 फेब्रुवारीपासून समाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी आपल्या सहका-यांसह मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशीही वनविभागाने या आंदोलनाची दखल न घेतल्याने संबंधितांवर कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कुडवे यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
मेंढरी ते गट्टा रस्त्याच्या कामासाठी मेंढरी, वांगेतुरी, गर्देवाडा आदी गावांतील वनजमिनीतून जेसीबीच्या सहाय्याने बेकायदेशीरपणे उत्खनन सुरू आहे. हे चित्र उघडपणे दिसत असतानाही आजतागायत वनविभागाने संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई केलेली नाही. संबंधित ठेकेदाराने हजारो ब्रास माती, मुरुमाचे उत्खनन केल्याने वनविभागाचा महसूल बुडाला आहे. हे काम वनाधिकाऱ्यांच्या संगनमताने झाल्याचा आरोप करीत या प्रकरणाची कठोर चौकशी करून वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. मात्र उपोषणाला 6 वा दिवस उलटूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
वनविभागाने संबंधितांवर कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र केले जाईल. तसेच 14 फेब्रुवारी रोजी भीक मांगो आंदोलन, 15 ला ढोल बजाओ आंदोलन आणि 16 फेब्रुवारीला मुंडन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांमध्ये योगाजी कुडवे, रवींद्र सेलोटे, चंद्रशेखर सिडाम, नीळकंठ संदोकार, आकाश मट्टामी, धनंजय डोईजड, रघुनाथ सिडाम, ईश्वर तिवाडे, राजू गडपायले, विलास भानारकर, आशिष नक्षीणे, अरविंद देशमुख आदी उपस्थित होते.
0 Comments