रंगभूमीची सेवा करण्याची सदानंद बोरकरांना शिक्षा sadanand borkar


रसिकांची दाद : युवा साहित्य संमेलनात 'अभिरुप न्यायालय' रंगले


अभिरुप न्यायालयात आरोपी सदानंद बोरकर, वकिल अविनाश पोईनकर व न्यायमूर्ती मिलींद उमरे

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आयोजित पहिले युवा साहित्य संमेलन नुकतेच सुमानंद सभागृहात पार पडले. दोन दिवसीय संमेलनात अभिरुप न्यायालयाचे सत्र चांगलेच रंगले. रसिकांनीही उत्स्फूर्त दाद दिली. अभिरुप न्यायालयात आरोपी म्हणून प्रख्यात नाट्यकलावंत, लेखक, दिग्दर्शक, चित्रकार प्राचार्य सदानंद बोरकर होते. वकिल म्हणून युवा कवी, मुक्तपत्रकार अविनाश पोईनकर यांनी सदानंद बोरकर यांच्या विरोधात आरोपपत्र सादर केले. न्यायमुर्ती म्हणून पत्रकार मिलींद उमरे यांनी भूमीका बजावली.

अभिरुप न्यायालयात वकिल अविनाश पोईनकर यांनी आरोपी सदानंद बोरकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. झाडीपट्टी रंगभूमी, लोककलेच्या संवर्धनासाठी शाश्वत संस्था उभारणीसाठी पुढाकार घेतला नाही, आदिवासींच्या प्रश्नांवर अजून नाटक लिहीले नाही, सदानंद बोरकरांना पद्मश्री, विधानपरिषदेचे वेध लागले आहेत का? चित्रकलेची स्वतंत्र शैली गवसलेली असतांनाही ती वाढवलेली नाही, अशा अनेक आरोपांना सदानंद बोरकर यांनी मिस्किलपणे उत्तरे दिली. परिणामी कला, साहित्य, रसिकांसाठीच हा जन्म असल्याची कृतज्ञता व्यक्त केली. झाडीपट्टी रंगभूमी संवर्धनासाठी पाठपुरावा सुरू आहे. सध्याच्या दोन घराचं गाव नाटकातील पात्रांना आदिवासींचीच नावे दिल्याचे सांगितले. पद्मश्री आणि विधानपरिषदेच्या आरोपांवर कलावंतांचा शासनाने सन्मान करायला हरकत नसल्याचे त्यांनी नमूद केले. जवळपास तासभर अभिरुप न्यायालयात सदानंद बोरकर यांच्यावर झालेले आरोप आणि त्यांनी दिलेले दिलखूलास उत्तरे यामुळे अभिरुप न्यायालय चांगलेच रंगले.

•••

न्यायाधिशांनी बोरकरांना ठोठावली शिक्षा

अभिरुप न्यायालयात आरोपी सदानंद बोरकर यांच्यावर आरोपपत्र सादर झाल्यानंतर न्यायमुर्ती पत्रकार मिलींद उमरे यांनी रंगभूमी व रसिकांची आयुष्यभर सेवा करण्याची शिक्षा ठोठावली. शिवाय औषधे कडू असली तरी चालेल पण तब्बेतीची काळजी घेणं बंधनकारक असल्याची सूचनाही दिली. 'ट्वेल्थ फेल' असणारे सदानंद बोरकर यांनी घेतलेली सांस्कृतिक झेप आजच्या युवक व पालकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत देखील न्यायमुर्तींनी व्यक्त केले.


Post a Comment

0 Comments