अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार
अहेरी : नुकतेच दिल्लीत सन्मान झालेल्या आशावर्करचा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते एका कार्यक्रमात शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांनी अहेरी तालुक्यातील वेलगुर सारख्या दुर्गम भागात उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिल्लीत सन्मान होणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत व्यक्त करत प्रसंशा केली.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन उत्सवानिमित्त आशा स्वयंसेविका उमा चालूरकर यांना दिल्ली येथे विज्ञान भवनमध्ये केंद्र आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
विशेष म्हणजे महाराष्ट्रात फक्त दोनच आशांना हा मान मिळाला आहे. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकेचा समावेश असल्याने त्यांचे आरोग्य विभागातून तसेच सर्व स्तरावरून तिचे अभिनंदन केले जात आहे. आरोग्य विभागातील उल्लेखनीय कामकाजाबद्दल हा सन्मान मिळाला आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्राचा आशा स्वयंसेविका उमा चालूरकर यांनी नाव लौकिक केल्याबद्दल मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी १८ ऑगस्ट रोजी आलापल्ली येथील एका कार्यक्रमात त्यांना शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिनेट सदस्य तनुश्री ताई आत्राम, माजी प.स.सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक एम.रमेश,उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, नियोजन समिती सदस्य नाना नाकाडे,ऋषिकांत पापडकर,युनूस शेख,अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी,भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे,एटापल्लीचे तहसीलदार हेमंत गांगुर्डे,अहेरीचे गटविकास अधिकारी राहुल वरठे,एटापल्लीचे गटविकास अधिकारी आदिनाथ आंधळे उपस्थित होते.
0 Comments