प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन



वैद्यकीय महाविद्यालये नागरिकांसाठी सेवा केंद्र ठरतील : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

गडचिरोली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आज गडचिरोलीसह राज्यातील एकूण 10 वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले.

   राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखली आयोजित या कार्यक्रमालाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य केंद्रीय मंत्री यांची  दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, खासदार नामदेवराव किरसान, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके तसेच इतर लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलतांना सांगितले की राज्यात सुरू होत असलेल्या नवीन 10 वैद्यकीय महाविद्यालयामुळे महाराष्ट्रामध्ये 900 वैद्यकीय प्रवेशक्षमता वाढून ती आता सुमारे 6 हजार होत आहे. ही वैद्यकीय महाविद्यालये स्थानिक व लगतच्या परिसरातील नागरिकांसाठी सेवा केंद्र बनतील. तसेच वैद्यकीय महाविद्यालयामुळे युवा वर्गासाठी वैद्यकीय शिक्षणाच्या नवीन संधीचे दरवाजे उघडले गेले असल्याचे ते म्हणाले. 
शासनाने वैद्यकीय शिक्षण सुलभ केले आहे असे सांगून पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील तरुणांसाठी नवीन संधींची दारे खुली झाल्याचे नमूद केले.  गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील जास्तीत जास्त मुले डॉक्टर व्हावीत आणि त्यांची स्वप्ने पूर्ण व्हावीत हे शासनाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. एकेकाळी अशा प्रकारच्या विशेष अभ्यासासाठी मातृभाषेतील पुस्तके उपलब्ध नसण्याचे मोठे आव्हान होते. सरकारने हा भेदभाव संपवला आणि महाराष्ट्रातील युवकांना  मराठी भाषेतून वैद्यकीय शिक्षण घेता येईल असे सांगितले. युवक मातृभाषेतून शिक्षण घेऊन  डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करतील असेही ते म्हणाले. ग्रामीण भागातील विद्यार्थीही वैद्यकीय शिक्षणात अग्रक्रमी राहतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2014 मध्ये राज्यात 387 वैद्यकीय महाविद्यालये होती ती आता 706 झाली असून सर्वाधिक वैद्यकीय महाविद्यालये महाराष्ट्रात असल्याचे व महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात अव्वल होत असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या उपक्रमांतर्गत आज राज्यात 10 वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येत असल्याचे व याचा आपणास मनस्वी आनंद असल्याचे सांगितले.

नियोजन भवन येथे मार्गदर्शन करतांना प्रभारी जिल्हाधिकारी आयुषी सिंह यांनी गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने जिल्ह्यातील व लगतच्या परिसरातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. .
अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे यांनी सांगितले की  गडचिरोली येथील वैद्यकीय महाविद्यालयात १०० विद्यार्थी प्रवेश् क्षमतेची परवानगी मिळाली असून चालू सत्रातच निट प्रवेश परिक्षेच्या तीसऱ्या फेरीत गुणवत्तेनुसार प्रवेश निश्चित करण्यात येतील. 85 जागा या महाराष्ट्रातील रहिवासी यांच्यासाठी राखीव असतील तर 15 जागा या संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांसाठी खुल्या राहतील.  एम.बी.बी.एस. प्रथम वर्ष अध्यापनासाठी नागपूर व चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांच्या सेवा गडचिरोली येथे वर्ग करण्यात आल्या असून नियमित अध्यापनासाठी कोणतीही अडचण नसल्याचे डॉ. टेकाडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाला वैद्यकीय क्षेत्रातील व इतर संबंधीत अधिकारी प्रामुख्याने उपस्थिती होते.

नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा शुभारंभ
 राज्याr नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता प्राप्त झाली आहे. यामध्ये गडचिरोलीसह, अमरावती, मुंबई, नाशिक, जालना, बुलडाणा, हिंगोली, वाशिम, भंडारा आणि अंबरनाथ (ठाणे) अशा वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे. 

Post a Comment

0 Comments