गडचिरोली : कमलापुर येथील श्रीगुरुदेव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रमशाळेतील दोन शिक्षकांना विद्यार्थिंनीसोबत असभ्य वर्तणूक केल्याच्या आरोपाखाली अडकविण्याची दोन खंडणीखोरांनी धमकी देत पैशाची मागणी केली असल्याचा आराेप शिक्षक श्याम धाईत व दिलीप राऊत यांनी केला आहे. आज मंगळवार ८ एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परीषदेत तशी माहिती दिली.
आपल्यावरील अन्यायाची माहिती देताना शिक्षक धाईत यांनी अतिरीक्त तासिकेत सर्व विद्यार्थ्यांना बोलावून २ अंकी व ३ अंकी संख्यांचे गुणाकार देत होतो. सर्व विद्यार्थी गुणाकार सोडवून आणून दाखवत होते. हे सुरू असताना एका मुलीचा भाऊ खिडकीतून डोकावून पाहात होता. त्या मुलीने तो माझा भाऊ आहे, असे सांगीतले असता मी त्यालासुद्धा गुणाकार सोडवण्यास दिला. वर्गातील सर्व विद्यार्थी गुणाकार सोडवून आणायचे आणि माझ्याकडून तपासून घ्यायचे. त्या मुलीला मी गुणाकार देण्यासाठी बोलावले. त्यानंतर ती मुलगी गुणाकार घेण्यासाठी माझ्या समोर बेंचवर बसली. गुणाकार देत असतानाच माझा पाय अनवधानाने त्या मुलीच्या पायाला लागला. यात माझा कोणताही वाईट हेतू नव्हता. त्यामुळे परत तिला मागील बेंचवर बसण्यास सांगीतले. त्या मुलीला वर्गामध्ये माझा पाय लागणे ही अनवधानाने घडलेली घटना आहे. यात माझा कुठलाही वाईट हेतू नव्हता. गेली २५ वर्षे मी या शिक्षकी पेशात आणि एकाच गावात कार्यरत असून यापूर्वी माझ्यावर असा कोणताही आरोप झालेला नाही. शिक्षक म्हणून वर्गात अध्यापनाचे कार्य करताना कळत-नकळत कोणत्याही विद्यार्थ्यांना हात, पाय लागू शकतो. यात कोणत्याही शिक्षकांच्या मनात वाईट उद्देश राहत नाही. परंतु काही दिवसांपासून या घटनेचा उहापोह करून काही खंडणीखोर माझ्याकडून स्वतःच्या घरी बोलावून १५ लाख रुपयांची मागणी करत आहेत. खंडणी न दिल्यास मुलीला व मुलीच्या पालकांना गाववाल्यांच्या माध्यमातून भडकवून वेगवेगळे आरोप लावून पोक्सो कायद्याखाली अटक करण्याची धमकी देत आहेत. परत आज सायंकाळपर्यंत पैशाची डिल न झाल्यास पत्रकार परीषद घेऊन खोटे व्हिडीओ बनवून दाखविण्यात येतील, अशी धमकी देण्यात आली आहे. तसेच इतर १० ते १२ मुलींनासुद्धा भुलथापा देऊन माझ्या विरोधात तक्रार करून व व्हिडीओ बनविण्याची धमकी देण्यात आली आहे. ही शाळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेली एक महान शाळा आहे. या शाळेत शिस्तीचे व चारीत्र्याचे पालन केले जाते. शाळेत चारित्रवान विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु काही खंडणीखोर लोकांचा या शाळेवर डोळा असून पैशाच्या लालसेपोटी नाना प्रकारचे आरोप करून मला व इतर कर्मचाऱ्यांना नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर तुम्ही माझ्या विरोधात तक्रार केल्यास गावगुंडांकडून जिवे मारण्याची व गावात राहू न देण्याची धमकीसुद्धा देण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात माझ्या जिवास केव्हा धोका निर्माण होऊ शकतो. याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एक उच्चस्तरीय समिती नेमून शाळेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांची चौकशी करावी. तसेच ज्या विद्यार्थ्यांना व तिच्या पालकांना भडकावून खोटे नाटे आरोप करून आमच्या विरुद्ध खोटी तक्रार करण्यास भाग पाडणाऱ्या खंडणीबाजावर तत्काळ कार्यवाही करावी, अशी माहिती त्यांनी केली आहे. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनाही निवेदन पाठवल्याची माहिती पत्रकार परीषदेत दिली.
0 Comments